'नासा'ने लावला 'पृथ्वी 2.0'चा शोध!
केप कॅनाव्हेराल (फ्लोरिडा) - ग्रहांचा शोध घेणाऱ्या केप्लर दुर्बिणीने पृथ्वीशी अत्यंत साधर्म्य असलेल्या पृथ्वी 2.0 या नव्या ग्रहाचा शोध घेतल्याचा दावा अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) केला आहे. "केप्लर-452 बी‘ असे या नव्या ग्रहाचे नामकरण करण्यात आल्याची माहिती "नासा‘तर्फे देण्यात आली.पृथ्वीशी अत्यंत साधर्म्य असलेल्या ग्रहाचा शोध लावण्यात यश आले असल्याचे "नासा‘ने म्हटले आहे. ग्रहांचा शोध घेण्यासाठी 2009 मध्ये "नासा‘ने अवकाशात केप्लर हे यान पाठविले आहे. या यानामधील दुर्बिणीच्या माध्यमातून नव्या ग्रहांचा शोध घेण्यात येतो. केप्लरने पृथ्वीशी साम्य असलेल्या नव्या ग्रहाचा शोध लावला असून, हा ग्रह पृथ्वीपेक्षा सुमारे 60 टक्क्यांनी मोठा आहे. हा ग्रह सिग्नस या नक्षत्रसमूहामध्ये असून, तो सुमारे 1400 प्रकाशवर्षे अंतरावर असल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
पृथ्वीशी साधर्म्य असलेले ग्रह याआधीही आढळून आले आहेत. या ग्रहाच्या आकारावरून तो खडकाळ असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. याचबरोबर, जीवसृष्टीसाठी अत्यावश्यक पृष्ठभागावरील पाणीही या ग्रहावर असण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील सविस्तर संशोधन लवकरच "दी ऍस्ट्रॉनॉमिकल जर्नल‘मध्ये प्रकाशित केले जाणार आहे.
‘सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरत असलेल्या पृथ्वीसारख्याच ग्रहाचा हा शोध अत्यंत उत्साहवर्धक आहे,‘ अशी प्रतिक्रिया या मोहिमेमधील सहभागी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. "केप्लर 452 बी‘ म्हणजे पृथ्वीच्या आकाराने व वयाने मोठा असलेला भाऊ असे वर्णन "नासा‘ने केले आहे.
पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा नव्या ग्रहाची त्रिज्या दीडपट मोठी आहे. "केप्लर 452 बी‘ हा सूर्याप्रमाणेच असलेल्या एका ताऱ्याभोवती भ्रमण करत असून, एका प्रदक्षिणेसाठी त्याला 385 दिवस लागलात. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात. या ग्रहावरील तापमान जास्त थंडही नाही आणि अती उष्णही नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा